Tuesday, June 21, 2011

ओढ


ओढ लागते अशी जीवाला
मन ’तारा तुटका’ होई
कसे कळेना किती क्षणार्धी
तुजपाशी ते जाई

साद उमटते इतकी आतून
’चातक’ मन हे होई
उमटे ना शब्द , कसे सांगावे
शब्दही विरून जाई

स्वप्ने उमटती ऐसी अक्षी
’राधा’ मन हे होई
साथ तुझी कल्पून येथे
गोकूळ सारे होई

आठव आठव असे दाटती
’अंबर’मन हे होई
मिती न काही इथे कशाला
बरसती दिशातून दाही

विरह तुझा हा मुळी न सोसवे
’सागर’ मन हे होई
क्षण क्षण एकेक किती कठीण तो
किती गुढ गहराई

जान्हवी

पाऊस


हवा धूंद झाली,
सडा प्राजक्ताचा
मनामध्ये पाऊस,
दाटूनी आला !

कूंद होते सारे,
मळभ दूर झाले
स्वप्नांच्या धारात मी
न्हाऊनी गेले !

वावटळ सरली,
गंध मंद भोवताली
गारांची सर सर ही
मोती धार आली !

शमले ताप सारे ,
शांत जीव झाला
मनामध्ये पाऊस
दाटूनी आला !

जान्हवी

रांगोळी

आज पहाटे नेमाने मी
हात गेरूचा फिरविला
हातामधूनी शुभ्र कळ्यांचा
पट समोरी मांडिला...

मग जुळूनी आल्या रेघा
उमटत गेली नक्षी
रंग भरू नव-नवे
स्वप्ने विहरली अक्षी...

पण अवचित आला वारा
विस्कळीत झाली कल्पना
कुठली उरली नक्षी आता
विस्कटून गेली अल्पना

मोडायाचे होते सारे
देवा,का रचलास डाव ?
आता फक्त मनात उरला
गर्द गेरूचा भाव !

जान्हवी

अल्पना - रांगोळी, अक्षी - डोळे

गणिते ही व्यवहारी


माझ्या मनास न कळती
तुझी गणिते ही व्यवहारी
माझ्या लेखी माझे तुझे
असणे एक जाहलेले !

मोजता न येई मजला
गुंतवणूक किती झाली
गुंतला हा जीव तुझ्यात
एवढेच मज कळलेले !

आखता न येई मजला
हि लक्ष्मणरेखा भावनांना
भाव माझे सारे आता
तुझ्याभोवती दंगलेले !

कठीण जाय किती मजला
हि वेळेची कहाणी
धीराच्या ह्या कसोटीत मी
पुरती नापास झालेले !

नको घालू वाद काही
हा भेद आहे कळलेला
तुझे माझे असे दुरूनी
मी चालणे आता पेललेले !

जान्हवी

काही फ़ुले काही मुले

टवटवीत फ़ुलांचे सुध्दा
गजरे मावळले जातात
इवल्या रापल्या चेहर्यांकडून
जेव्हा ते विकले जातात

मुले उसने घेतात तात्पुरते मग
फ़ुलांचे हसरे चेहरे
फ़ुलातही उतरून येती नि
भाव गडद गहिरे

दोघेही जण असतात
मायेविना उरलेले
आपापल्या जगापासून
कितीतरी तुटलेले

ह्या अथांग विश्वात अन्
त्यांचा मांडला जातो बाजार
सोसावा लागतो त्यांना
सार्या संसाराचा भार

आपल्यालाही फ़ुलांसारखं
थोडं वागता येइल
आपल्या ओठीचं थोडं हसू
त्या पोरांच्या ओठी घालता येइल..

जान्हवी

पहाट

पुन्हा सरला, तम तो सरला
शुक्र चांदणी लुकलुकती
अंधुक अंधुक तरी अजुनही
चंद्र कोर हि मावळती

लाल-गुलाबी रथ हा उधळे
किरण धुळीचे पाझरती
स्वागतोत्सुक सारे जमूनी
पक्षी मंजूळ किलबिलती

लगबग लगबग समीर सरावे
सडा प्राजक्ते घातीला
लखलख लखलख सारा सारा
महाल आहे सजलेला

उठा , सज्ज व्हा सारे सारे
चिंब दवात न्हालेली
लाजत,मुरडत अमुची राणी
पहा, आली पहाट आलेली
आली पहाट आलेली

जान्हवी

कविता


भावनांचे मेघ दाटती
कल्लोळ होतो शब्दांचा
कागदावरी अन् उतरत जातो
पाउस वेड्या कवितेचा

असह्य होवुनि अंधार दाटतो
वादळ वारा विचारांचा
कागदावरी...

विजकल्पना त्यातून स्मरते
वेध घेत त्या तिमीराचा
कागदावरी...

तंद्री लागते कसलीशी अन्
नाद ताल त्या धूंदिचा
कागदावरी...

झरझर झरझर हात चालतो
श्वास बनोनि शाइचा
कागदावरी...

प्रतिबिंब त्यातच उमटत जाते
तो आरसा होत मनाचा..
कागदावरी...

जान्हवी

आमचे आपले गुंत्यात पाय..


अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

अहो, गीता , पुराण वाचतो कोण?
वाचली जरी जाणतो कोण ?
असलं काही वाचायला वेळच नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

आत्मा, बित्मा कुणास ठावा ?
आनंद म्हणजे आराम हवा
’आत्मानंद’ शब्दही झेपत नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

कुठला समाज? कसली सेवा ?
आम्ही चेपतो आमचा मावा
भाकर-तुकडा देणं कधी जमतच नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

आज काय बंद, उद्या काय भांडण
मग काय नेहमीचच घरातलं कांडण
हेच हेच दळण आम्हा सोडवत नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

अहो,कसली तत्वं? कसलं ज्ञान ?
चिंताच सदा, आमचं हेच तत्वज्ञान
चिडचिडीशिवाय काही जमतच नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

कसलं जुनं, कसलं नवं
साहित्य,छंद हा आमचा प्रांतच न्हवं
मग कुठला प्रांत आम्हा पुसायाचे नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

कसले प्रश्न , कसले उपाय?
चर्चा, मोर्चा, प्रसार आणि काय बाय
असलं काही कधी आम्ही पहातही नाय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

काय हळवं, कठोर काय ?
खरं म्हणजे बोलायाला वेळच नाय
तेच तेच रहाट-गाडगं चालतच र्ह्याय
अहो कसचं काय, कसचं काय ?
आमचे आपले गुंत्यात पाय..

जान्हवी

गोडवा ...


मुग्ध हे अबोल हे
हे असेच राहू दे
अमूर्तता अशीच ही
अपुल्या मनात वाहू दे

अव्यक्त जे तसेच ते
काही काळ राहू दे
व्यक्त ते करण्यास हे
अधर अधिर होऊ दे

वेळ ही , अवेळ ही
आठव उगाच येऊ दे
हुरहुर ही अन मनात
अस्वस्थताही दाटू दे

आज ना कळाले जरी
बघ कळेल तेधवा
अबोल ह्या मुग्धतेत
असेल खास गोडवा

...दिसेल ..खास...गोडवा...


जान्हवी

चांदण्यांची माळ


प्रत्येकाच्या वाट्याला
एवढंस आभाळ
आभाळात प्रत्येकाच्या
चांदण्याची माळ

चांदण्यांची माळ
आपापली शोधावी
नक्षी हवी तशी
आपणच गुंफावी

नाही म्हणू नये
मिटून घेउ नये डोळे
पिऊन घ्यावे सारे
शुभ्र चांदण सोहळे

प्रत्येकाच्या वाट्याला
काळोखं असतं आभाळ
काळोखातच रंगत जाते
शुभ्र चांदण्यांची माळ

जान्हवी

फरक

कधी जमतच नाही का रे तुम्हाला ?
असं रोमारोमातून फुलून येणं..
सारं सारं काही आपलं कुणा दुज्याचं होणं....

तुमची मिती ठरलेलीच बहुदा
नड शारिरीक सहवासाची
फार तर मैत्रि मुक्त गप्पांची....

पण त्यापल्याडही असतं रे खूपसं
काही खूप खूप खोलसं..

तुमच्या मनांना सांभाळणारं कुणी हवं असतं कबूल
पण तिलाही असते रे गरज तिचे रागरंग सांभाळणार्या कुणाची...
फ़क्त ती गरज कायमच मुग्ध नि अबोल
तिची अपेक्षा तिनं न सांगता कुणी समजून घेण्याची..

कितीही काम रगाड्यात तिच्या सोबत सतत जाणीव तुझ्या अस्तित्वाची
अन तुम्हाला पुरे सबब कामात गुरफटल्याची...

कधीतरी एकदा उतरून बघ मनात दोघांच्या..
तुझ्या मनात सापडेल एक कोपरा तिच्या नावाचा
अन तिच्या मनात भरून उरलेला सागर तुझ्या अस्तित्वाचा...

जान्हवी

सडा बोलका झालेला ..


झाड पारिजातक
स्तब्ध स्तब्ध रातिला
पहाट होता जरा जरा
सडा भोवती घातीला...

रजनीगंधा, रजनीगंधा
मुकी,मुकी ती रातीला
रात होता जरा जरा
गंध बोलका झालेला

मुकी मुकी मी
दिवस नि राती
अन्धार मनात दाटीला
किरण येता जरा जरा
सडा बोलका झालेला ..


जान्हवी

तरंग


तरंग उमटले तेंव्हा
दोघांच्याही भोवती
अन मी समजले ,
हेच हवसं,
हेच अपेक्षित...

मी बुडालेय ,
खोल खोल आत
खोल तुझ्या अंतरंगात,
ओलेती अन जखमी होउन
तुझ्या तळापर्यंत..

माझा उडाला टवका
तू विचारलच नाहिस पण
माझ्या दुखवल्या मनाला..

कदाचित ... कदाचित तुला प्रश्न असेल..
दगडाला कुठे असतं मन ..
अन कुठे असते जागा दु:खाला..?



काळ लोटलाय जरासा...
आता कुठले नामोनिशाण कशासाठी ?

तुझ मन पुन्हा तसच ..
स्वच्छ आणि नितळ...
कदाचित....कदाचित...
नविन दगडाला मोहात पाडण्यासाठी .... !

जान्हवी

धरण


काठोकाठ भरलेल्या
डोळ्यातल्या डोहानं
काठावर येत विचारलं
"का अडवल्यास माझ्या लाटा?"

बोलते झाले मग
थोपवलेले शब्दांचे उमाळे
विचारत आले
"का अडवल्यास माझ्या वाटा?"

कसं सांगू त्यांना
मन झालय धरण
फ़क्त एकांतात इथे उघडले जातात दरवाजे
अन् वाहात जातात धारा
हवं तेंव्हा वाहत जाणर्या मुक्ततेला
इथे आहे कुठे थारा ?

जान्हवी

पहाट वाऱ्याचा सोबती......


पहाट वाऱ्याचा सोबती
तुझी अस्पष्ट चाहूल
माझ्या मनाच्या गाभारी
लक्ष दीप उजळतात....

लक्ष दिव्यांचा सोबती
तुझं नव्याने स्वागत
माझ्या मनाच्या गाभारी
नवी प्राजक्ताची रास.....

प्राजक्ताच्या राशीवरी
तुझ्या हसण्याचे तूषार
माझ्या मनाच्या गाभारी
कोणा क्षितीजाची आस.....

कोणा क्षितीजाच्या परी,
आपल्या प्रेमाची सोबत,
माझ्या मनाच्या गाभारी
पहाटवारा रेंगळत...
पहाटवारा रेंगळत......-------जान्हवी

मनाच्या तळ्यात


मनाच्या तळ्यात
रोज नवीन दगड
रोज नवीन तरंग
क्षणोक्षणी उमटतो
नवनवा रागरंग......१

मनाच्या तळ्याचा
कसा असह्य आवेग
वाहत जाती डोळेही
आता ह्या सवे ग.....२

मनाच्या तळ्याचे
किती चालती हे ढंग
काळ लोटता जरासा
मन पुन्हा हो अभंग....३

जान्हवी

वसंत

वसंत

कुठे फ़ूटते नवी पालवी
कोकिळा कूजन् करते रे
इथे वसंता खूळी उभी मी
वाट तुझी नि पाहते रे ...

गुलमोहोर तो दारामधला
सडा स्वागता रचतो रे
इथे...

मोहरलेले अंग अंग ते
सूगंध तो दरवळतो रे
इथे..

पळस पताका पिवळ्या सजल्या
पान उगा ते लाजे रे
इथे..

माझ्यासह बघ फ़ुलून सारे
तुझ्याचसाठी सज्ज अरे
इथे...

जान्हवी

मौन

मौन

तुझे नि माझे कसे अचानक
बंध नवे हे जुळले रे
मौनातून सारे कळले रे !

अबोल झाले काही बोलके
शब्दही परके झाले इतुके
मना मनांच्या हिंदोळ्यावर
काही नविन घडले रे
मौनातून सारे कळले रे !

तुझ्या मनात जे जे काही
मेघ शब्दांचे तेच इथेही
तुझ्या मनाचे पाउल आता
माझ्या मनी उमटले रे
मौनातून सारे कळले रे !

तुझे नि माझे कसे अचानक
बंध नवे हे जुळले रे
मौनातून सारे कळले रे !